गुरुवार 5 मार्च रोजी शिवजन्मोत्सव सोहळा भव्य देखावा शुभारंभ
स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे स्वाभिमानी संगमनेर तालुका शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने यावर्षी भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथे गुरुवारी 5 मार्च रोजी सायं. 6 वाजता या देखाव्याचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व मा.आ. डॉ सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराजांचा पुतळा येथे आई तुळजाभवानी यांचा भव्य देखावा उभारण्यात आला आहे. आकर्षक विद्युत रोषणाई सजावट आणि प्रसन्न मूर्ती असलेला हा देखावा नागरिकांसाठी तीन दिवस दर्शनासाठी खुला राहणार आहे.
देखाव्याचे उद्घाटन झाल्यानंतर याचबरोबर या जयंती उत्सवात किल्ले शिवनेरी येथील महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले ढोल ताशा पथक, युवकांसाठी डीजे, शिवकालीन मर्दानी खेळ, एलईडी लाईट शो, फटाक्यांची आतिषबाजी व फ्लावर्स ब्लास्टर्स यांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा संगमनेर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ होणार असून अत्यंत संस्मरणीय ठरणार आहे.
तरी ,तालुका व शहरातील तमाम नागरिक बंधू-भगिनी व शिवप्रेमींनी या शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आई तुळजाभवानीच्या भव्य देखावा उद्घाटन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका शिवजन्मोत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.







