‘वाचन संस्कृती संपलेली नाही, फक्त माध्यम बदलले!’ – गझलकार प्रदीप निफाडकर
संगमनेरमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा

संगमनेर : वाचनसंस्कृती लोप पावत असून युवा पिढी पुस्तकांपासून दूर गेली आहे, हा समज वास्तवाला धरून नसल्याचे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष तथा ज्येष्ठ गझलकार प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. आजच्या पिढीने वाचन सोडलेले नाही, तर वाचनाची माध्यमे बदलली आहेत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे साहित्यिक व साहित्यप्रेमींची संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. संतोष खेडेकर, प्रा. डॉ.सी ए .अनंत दिवेकर, अनिल सोमाणी, प्रा. हिरालाल पगाडल यांच्यासह विविध क्षेत्रातील साहित्यप्रेमी उपस्थित होते.
निफाडकर यांनी सांगितले की, मोबाईल, टॅबलेट आणि अन्य डिजिटल माध्यमांमुळे वाचनाचे स्वरूप बदलले असले तरी साहित्याबद्दलची ओढ कायम आहे. दर्जेदार साहित्य अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लेखक, प्रकाशक आणि साहित्यिक संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील साहित्याचा डिजिटल संग्रह तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ई-पुस्तकालयाची सुविधाही उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीदरम्यान अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून विविध साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर चर्चा झाली. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी तसेच वाचकांना उत्तम दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचे निफाडकर यांनी अधोरेखित केले.
प्रास्ताविकात डॉ. संतोष खेडेकर यांनी उपस्थितांची ओळख करून देत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. साहित्यसंस्कृतीच्या संवर्धनासाठी परिषदेच्या माध्यमातून संगमनेरमध्ये नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम राबविता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संगमनेरमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा स्थापन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या उपक्रमाला स्थानिक साहित्यप्रेमींसह डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांचा पाठिंबा लाभत असल्याचे सांगण्यात आले.
प्रा. हिरालाल पगाडल यांनी साहित्य संमेलनांमध्ये सर्व साहित्यिक प्रवाहांना समान संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. अनिल सोमाणी यांनी अभिवाचनाला स्वतंत्र व्यासपीठ देण्याची गरज मांडली. त्यामुळे युवकांमध्ये साहित्याविषयी आकर्षण निर्माण होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. प्रा. डॉ. सी. यू. अनंत दिवेकर यांनी अभिवाचनामुळे लेखक, वाचक आणि पुस्तकप्रेमी यांच्यात सशक्त संवाद निर्माण होत असल्याचे सांगितले. प्रत्येक घरात वैचारिक आणि संदर्भग्रंथ असावेत, यावरही त्यांनी भर दिला.
संगमनेरमध्ये पुस्तक दालन उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. खेडेकर यांनी दिली. भवानीशंकर पंडित, न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्यासारख्या साहित्यसेवकांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याला दिलेल्या योगदानाचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.
कार्यक्रमात डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते प्रदीप निफाडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अधिवक्ता राजू खरे, तुषार गायकर, मिलिंद आवटी, आलोक बर्डे, सागर पन्हाळे, ॲड. ऋषिकेश म्हस्कुले, दीपक क्षत्रिय, किशोर पेठकर, अनिता निफाडकर, वैशाली खेडकर, रीना कडलग, भाग्यश्री थोरात, मंगल पेटकर यांच्यासह मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.







