ताज्या घडामोडी

दिल्लीतील 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ पाडण्याच्या कारवाईविरोधात संताप

संगमनेर येथील भक्तांची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

 

संगमनेर, ता. — दिल्लीतील झंडेवालन भागातील सुमारे 1500 वर्षे जुने प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ — मंदिर दरगाह श्री बाबा पीर रतननाथ जी महाराज यांच्या भूमीवर नुकत्याच झालेल्या बुलडोझर कारवाईविरोधात संगमनेर तालुक्यातील भक्त आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. या संदर्भातील निवेदन उपविभागीय अधिकारी (महसूल), संगमनेर यांना हिंदू सनातन धर्म सभा, संगमनेर यांच्या वतीने सादर करण्यात आले.

 

 

निवेदनात म्हटले आहे की, 1947 च्या फाळणीनंतर पेशावर, लांडी कोटल, खैबर खिंड इथून हिंदू निर्वासित भारतात दाखल झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिल्लीतील झंडेवालन येथे हे धार्मिक स्थळ उभारून आजपर्यंत जतन केले आहे. गुरु गोरखनाथ यांचे शिष्य असलेल्या श्री बाबा पीर रतननाथ जी महाराजांच्या परंपरेशी जोडलेले हे मंदिर आजही हिंदू, पंजाबी, शीख, सिंधी अशा विविध समाजघटकांसाठी श्रद्धेचे केंद्र मानले जाते.

निवेदनानुसार, 29 नोव्हेंबर 2025 रोजी प्रशासनाने अचानक बुलडोझरद्वारे पाडकाम सुरू केले, ज्यामुळे लाखो श्रद्धावंतांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. इस्लामिक देशांमध्येही अनेक ठिकाणी हिंदू परंपरा जपली जात असताना, भारतात अशाप्रकारे प्राचीन धार्मिक स्थळावर कारवाई होणे अत्यंत दुर्दैवी असल्याचा निषेध देखील भक्तांनी व्यक्त केला आहे.

या मंदिराच्या शाखा *गोविंदपुरा (अहिल्यानगर)* आणि *कोपरगाव (राममंदिर मार्ग)* येथेही असून, महाराष्ट्रातील अनेक भक्त या धार्मिक परंपरेशी भावनिकरित्या जोडलेले आहेत. दिल्लीतील कारवाईमुळे स्थानिक तसेच राज्यभरातील भाविक संतप्त झाले असून, कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी होत आहे.

 

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • धार्मिक स्थळाची जमीन व मालकी हक्क तात्काळ मंदिर प्रशासनास परत देण्यात यावेत.
  • सुरू असलेली पाडकामाची कारवाई तत्काळ थांबवावी.
  • धार्मिक भावना दुखावणाऱ्या या घटनेची दखल घेऊन न्याय्य उपाययोजना कराव्यात.

हिंदू सनातन धर्म सभेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “हे फक्त मंदिराचे मुद्दा नाही, तर निर्वासित हिंदूंच्या शतकांपासून चालत आलेल्या परंपरेचा, इतिहासाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्ही शांततामय मार्गाने न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करत राहू.”

निवेदन उपविभागीय अधिकारी काटे यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले असून, पुढील निर्णयाची प्रतीक्षा भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.त्या वेळी सुरेश कालडा, ओमप्रकाश कालडा, निखिल पापडेजा, माजी नगराध्यक्षा दुर्गा ताई तांबे, नीलिमा खताळ, त्रिलोक सिंग पंजाबी,शोभा कालडा, हेमा राजपाल, कोमल राजपाल,सुनीता पापडेजा, सुरेश डांग आदी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.