ताज्या घडामोडी

संगमनेरमधील ‘त्या’ चौकाचे अधिकृत नामकरण ‘मराठा क्रांती चौक’ करा; सकल मराठा समाजाची पालिकेकडे मागणी

संगमनेर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे (शिवजयंती) औचित्य साधून, संगमनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मराठा आरक्षण लढ्याचे केंद्रबिंदू ठरलेल्या नवीन नगर रोडवरील चौकाचे अधिकृत नामकरण ‘मराठा क्रांती चौक’ असे करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सकल मराठा समाज, संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले असून, प्रशासकीय दप्तरी या नावाची नोंद करण्याची विनंती करण्यात आली आहे.

आंदोलनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी

निवेदनात नमूद केल्यानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील सकल मराठा समाजाने नवीन नगर रोडवरील बसस्थानकासमोरील चौकातून शांततामय आणि कायदेशीर मार्गाने आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. याच ठिकाणाहून आंदोलनाची सुरुवात झाल्याने या चौकाला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये ‘मराठा क्रांती चौक’ म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.

दप्तरी नोंद करण्याची मागणी

सध्या या चौकात ‘मराठा क्रांती चौक’ अशा नावाचा फलकही लावण्यात आला आहे. लोकभावनेचा आदर करून आणि या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन नगरपरिषदेने आपल्या ठरावात या चौकाचे नाव अधिकृतपणे ‘मराठा क्रांती चौक’ असे नमूद करावे आणि तशी नोंद दप्तरी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.