संगमनेर विशेष

सामान्य कुटुंबातील असामान्य कर्तृत्व- IAS ऋतुजा अशोकराव गायकवाड

कर्तृत्वाच्या ग क्षितिजी
तूच शुक्राची चांदणी
तुझी तेजप्रभा जणू
दाही दिशांच्या कोंदणी

या वर्णनाप्रमाणे संगमनेर तालुक्यातील चमकता हिरा ऋतुजा अशोकराव गायकवाड तिच्या कर्तृत्वाने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात तळपत आहे. तिचे अथक परिश्रम, जिद्द, असामान्य बुद्धीमत्ता आणि प्रतिकूल परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याची चिवटवृत्ती प्रशंसनीय आहे.
ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण जि.प प्रा. शाळा नान्नज दुमाला येथील शाळेत झाले. दहावी पर्यंतचे शिक्षण गावातील माऊली विद्यालय नान्नज दु॥ येथे झाले. तर उच्च माध्यमिक शिक्षण ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथे घेतले.शालेय जीवनात नेहमीच एक शिस्तप्रिय , अभ्यासू व मितभाषी विद्यार्थीनी म्हणून ऋतुजाचा नावलौकिक होता. दहावीत प्रथम क्रमांक मिळवत तिने यशाचा झेंडा रोवला. ग्रामीण भागात शिक्षण घेऊनही दहावीपेक्षा बारावीत सायन्स शाखेत तीने जास्त गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली व तालुक्यात ९५% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. इंजिनिअरींगला टॉपच्या कॉलेजात प्रवेश होत असतानाही प्रशासकीय अधिकारी बनण्याच्या स्वप्नामुळे तीने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये बी टेक ॲग्रीला प्रवेश घेऊन तयारी सुरू केली. याला तिचे आई वडीलांनी मोलाची साथ देत तीचा उत्साह द्विगुणित केला. पदवीनंतर तीने थेट दिल्ली गाठत संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. चार वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर ऋतुजाने २०२६ मध्ये यशाला व ध्येयाला गवसणी घातली. ऋतुजाचा प्रवास पाहताना नकळत स्त्री विषयीचा आदर मनात घर करून राहतो.

विस्तारल्या दाही दिशा
मुक्त झाले नभांगण
आम्ही व्यापले अवघे
लकाकते तारांगण

अशी भावना समस्त स्त्री वर्गाच्या मनात डोकावून जाते.
अनेक अडचणींचा सामना करत मुलगी असण्याचे भांडवल न करता तिने केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर ही यशश्री खेचून आणली. ऋतुजाच्या भेटीदरम्यान तीचे साधे व्यक्तिमत्व प्रत्येकाला मोहून टाकते. समाजातील लहानात लहान घटकांच्या सेवेचा तीचा निर्धार खूप काही सांगून जातो. आणि समाजाला अशाच प्रशासकीय प्रमुखाची गरज असल्याची भावना अधोरेखित करतो.

झेंडा गेला कर्तृत्वाचा
साता समुद्राच्या पार
नाही झुकवित माथा
नाही पत्करीत हार

या प्रमाणे ऋतुजाचा दृढविश्वास अढळ वाटतो.
आज तीने संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशात १०६ वी रँक मिळवत आपली कलेक्टरची जागा निश्चित केली आहे. हा खूप अभिमानाचा व गौरवाचा क्षण आहे. कन्येला इतके दूर अभ्यासासाठी ठेवणाऱ्या मातापित्यांच्या संयमाचेही कौतुक करायला हवे. लेकीच्या यशाच्या गौरवाचा क्षण वर्णन करताना बापाचा दाटून आलेला कंठ सर्व काही सांगून गेला. आईच्या विश्वासाला सार्थ ठरवणारी ही कन्या खरंच सर्वांचा अभिमान आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जन्माला आलेली ती पहिली महिला कलेक्टर ठरली आहे. आम्हां सर्व प्राथमिक शिक्षकांना गौरवास्पद व भूषण ठरणारी ही गोष्ट एक मैलाचा दगड ठरावी अशी आहे. प्रशासकिय सेवेचे स्वप्न पाहणाऱ्या मुलामुलींना प्रेरणादायी आहे.
ऋतुजाच्या कर्तृत्वाला सलाम तीला मार्गदर्शन करणारे शिक्षक, प्रयत्नावर विश्वास ठेवणारे व दृढसंयमी आईवडील यांचेही खूप खूप अभिनंदन. गायकवाड परिवाराचेही अभिनंदन. ऋतुजाला भावी वाटचालीसाठी व समाज सेवेच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! अभिनंदन !!

शब्दांकन

सौ. सुनिता जयराम घुले
प्रा. शिक्षिका कवयित्री , लेखिका
अध्यक्षा – साहित्य कला मंच संगमनेर
8975234142

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.