कला जगत

साहित्य कला मंच संगमनेर तर्फे ५ मार्च रोजी ‘झाकाळल्या नभात’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

संगमनेरमध्ये रंगणार साहित्य सोहळा; आदर्श वाचनालय पुरस्कारांचेही होणार वितरण

संगमनेर: प्रतिनिधी निसर्गाच्या विविध छटांना शब्दांच्या कुंचल्याने कागदावर उतरवणारे कवी अ‍ॅड. सुभाष बी. गोडगे यांच्या लेखणीतून साकारलेला ‘झाकाळल्या नभात’ हा काव्यसंग्रह आता रसिकांच्या भेटीला येत आहे. वरुणराजाच्या आगमनाने रोमांचित झालेल्या सृष्टीचे विलोभनीय दर्शन घडवणारा हा काव्यप्रवास येत्या गुरुवारी, ५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता उलगडणार आहे.

साहित्य कला मंच, संगमनेर आयोजित हा सोहळा ‘व्यापारी असोसिएशन’ हॉल (डी . एम . मुळे चष्माघर चे वरती ) येथे संपन्न होईल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, संगमनेरच्या नवनियुक्त नगराध्यक्षा मा. डॉ. मैथिलीताई तांबे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तर, शब्दांचे गारुड असणारे सुप्रसिद्ध कवी मा. प्रा. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन होऊन अक्षरांना नवी ओळख मिळेल. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक मा. प्रा. पोपट सातपुते यांची प्रमुख उपस्थिती सोहळ्याची शोभा द्विगुणित करणार आहे.

अक्षरांचा सन्मान आणि वाचनसंस्कृतीचा जागर केवळ कवितांचा उत्सवच नव्हे, तर समाजात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या बारा सार्वजनिक वाचनालयांना यावेळी ‘आदर्श वाचनालय पुरस्कार’ देऊन गौरविले जाणार आहे. तसेच, ‘झाकाळल्या नभात’ या विषयावर घेतलेल्या काव्य स्पर्धेतील विजेत्या कवींचाही यथोचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.

शब्दांच्या या अथांग नभात हरवून जाण्यासाठी आणि वाचनसंस्कृतीच्या या मंगल सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी संगमनेरमधील सर्व रसिक-वाचकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आर्जवी आवाहन साहित्य कला मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.