संगमनेर विशेष

मानवी जाणिवांना शब्दांत व्यक्त करणारा काव्यसंग्रह : स्वाजंली

कवी अनिल चांडक यांचा स्वाजंली काव्यसंग्रह प्रकाशना नंतर बऱ्याच दिवसांनी वाचण्याचा योग आला. प्रवरेचे पाणी या प्रकाशनाद्वारे प्रकाशित या संग्रहात ९६ कविता असून ९९ पृष्ठे आहेत. आकर्षक असे मुखपृष्ठ शीर्षकाला साजेसे असल्याचे दिसून येते.

या कविता संग्रहाच्या रूपाने कवी अनिल चांडक यांचा पहिलाच कवितासंग्रह वाचकांच्या भेटीस आला आहे. या पुस्तकात कवीने अनेक जुने व नवीन काव्य प्रकार हाताळले आहेत. त्यामुळे जागोजागी नवखेपण जाणवते. तसेच काही कविता अतिशय भावस्पर्शी व वाचकाच्या मनाला भिडणाऱ्या आहेत. अनेक नव्या काव्यप्रकारासोबतच कवीने गीत,अभंग लावणी, अष्टाक्षरी, षडाक्षरी, दहाक्षरी असे जुने काव्यप्रकारही उत्तम रित्या हाताळले आहेत. निसर्ग, कोरोना , स्रीवाद अध्यात्म, महापुरुष , देशभक्ती, रुढीपरंपरा , सण , काळाचा महिमा , गावाचा अभिमान , राजकारण, व्यापारातील चढउतार अशा विविध विषयावरील कविता आपल्याला वाचावयास मिळतात. यातून कवीचे शब्दप्रभुत्व व एकाच वेळी अनेक विषय व जीवनाचे विविध पैलू हाताळण्याचे कौशल्य दिसून येते.
यशिवाय विडंबनकाव्य ही लयबद्ध झाले आहे. स्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर विठ्ठला , सुचत नाही मज उपाय म्हणत त्यांनी विनोद निर्मितीही केली आहे.

तसेच छंद पांडुरंग या कवितेत
अबीर गुलाल
उधळीत रंग
नि:शब्द नि:संग
आत्म पांडुरंग ।
असा पांडुरंग भेटीचा साक्षात्कार घडवला आहे.
विविध रसातील कविता वाचताना खरोखर त्या रसाची प्रचिती कवितेतून आल्याशिवाय राहत नाही. याच बरोबर कवी मनाची घालमेल कुठे येऊन ठेपलो या कवितेतून प्रकर्षाने जाणवते.
प्रारब्धाचे भोग निराळे
का वाट्याला यावे
नियती च्या फटकाऱ्याने
छिन्न छिन्न मी व्हावे
ही कुणा एकट्या दुकट्याची अवस्था नसून सर्व मानवजातीची समस्या असल्याचे प्रकर्षाने जाणवते .
बोलू लागला आरसा, मरण हे चुकले कोणाला या कवितेंतील ओळीही खूपच उद्बोधक आहेत. स्वतः पासून परिवर्तन करण्याची प्रेरणा देतात.
संकल्प मनी निश्चयी धरावे
मानवतेचे जतन करावे
अंधांसी ज्योतीचे दान करावे*
मरावे परि ,नेत्ररुपाने उरावे

नेत्रदानाचा संकल्प करण्याचा सल्ला कवी देताना दिसतो. त्या चप्रमाणे प्रत्येकाला पडलेला शाश्वत प्रश्न म्हणजे दिवा कोण व्हायचे कवितेत कवी विचारताना दिसतो.
दलदलीतून रस्ता काढण्या
कोण .. पुढे व्हायचे !
अंधारात ही वाट दावण्या
दिवा कोण व्हायचे !

कवीला मनाला नेहमीच चांगले घडवण्याची ओढ असते. सकल मानवाचे कल्याण व्हावे म्हणून पसायदान मागणाऱ्या ज्ञानोबांचे ऋण कवी विसरत नाहीत.
ज्ञानियांचा राजा । जगत माऊली
कीर्तीची सावली ।*त्रिखंडात ।असे माऊलीचे गुणगान कवी गातो.

अशा प्रकारे नानाविध विषयावर कवितेच्या माध्यमातून कवी अनिल चांडक या काव्य संग्रहातून व्यक्त होतात. कवीची मायबोली मराठी नसल्यामुळे काही प्रमाणात व्याकरणाच्या त्रुटी राहून जातात. हे मान्य करावे लागेल.
पुस्तकातील काही कविता दिर्घ झाल्या आहेत. पण एकदंरीत कवितासंग्रह वाचनीय झाला आहे, यात शंका नाही. सर्वांनी काव्यसंग्रह वाचावा व रसास्वाद अनुभवावा. नक्कीच कवीस प्रेरणा मिळेल अशी आशा वाटते.

सौ. सुनिता जयराम घुले
संगमनेर
जि. अहिल्यानगर

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.