संगमनेर मुद्रक संघाचा ‘जागतिक मुद्रण दिन’ उत्साहात

संगमनेर प्रतिनिधी- “विना संघटना नाही व्यवसाय वृद्धी” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून, संगमनेर मुद्रक संघाच्या वतीने ‘जागतिक मुद्रण दिन’ मोठ्या उत्साहात आणि संकल्पपूर्तीचा निर्धार करत साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित स्नेहसोहळ्यात संगमनेरच्या मुद्रण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व दिवंगत बिहारीशेठ डंग यांच्या स्मृतींना उजाळा देत, दरवर्षी याच दिवशी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्व मुद्रक बांधवांनी एकमताने घेतला.
मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता ‘सुसिंद पेपर्स’ (ताजणे मळा, डॉ. सावंत हॉस्पिटल समोर) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुद्रण शास्त्राचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुद्रण क्षेत्रातील विविध प्रिंटर्स, डिझायनर्स आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कुळधरण यांनी केले. त्यांनी मुद्रक संघाच्या कार्याचा आढावा घेत संघटनात्मक शक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. मुद्रण क्षेत्रातील ज्येष्ठ अनुभवी जालिंदर पानसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजच्या स्पर्धेच्या आणि डिजिटल युगात टिकण्यासाठी मुद्रकांनी बदलत्या काळाप्रमाणे आपल्या कामाच्या पद्धतीत आणि तंत्रज्ञानात बदल करणे अनिवार्य आहे.” आधुनिक यंत्रसामग्री आणि नव्या सॉफ्टवेअर्सचा वापर करून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच गिरीश फड यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
मुद्रण संघाचे कार्याध्यक्ष महेश डंग यांनी बिहारीशेठ यांच्या जुन्या ‘सोनेरी’ आठवणींना उजाळा देत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास मुद्रण संघाचे कार्याध्यक्ष महेश डंग, नामदेव कुळधरण, शरद खताळ, शांताराम आडेप, जालिंदर पानसरे, मंगेश फटांगरे, सुनील कडलग, वसंत पावबाके, सागर पन्हाळे, गिरीश फड ओमप्रकाश ढोले, गायके, संदीप शेळके, कोल्हे यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक मुद्रक बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.







