कला जगतताज्या घडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगासाठी प्रेरणादायी–मा. मंत्री बाळासाहेब थोरात

रायबा हेच का आपलं स्वराज्य नाटकांत जनतेच्या डोळ्यात घातले अंजन

संगमनेर (प्रतिनिधी)–समाजातील अठरापगड जाती धर्मातील जनतेला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले. सामाजिक न्याय, समता, महिलांचा सन्मान, लोकशाही, शेतकऱ्यां प्रति आदर हे महाराजांचे जीवन कार्य जगातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून इतिहास व सध्याची सामाजिक स्थिती यावर भाष्य करणारे रायबा हेच का आपलं स्वराज्य या नाटकांना उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातलं. अनेक प्रसंगांमध्ये अनेकांना अश्रू आवरता आली नाही. तर जाती धर्माच्या नावावर सध्या होणारे राजकारण अत्यंत दुर्दैवी असल्याचे या महानाट्यातून दाखवण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने कवी अनंत फंदी फुले नाट्यगृहात रायबा हेच का आपले स्वराज्य स्वराज्य हे महानाट्य सादर झाले. यावेळी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, पांडुरंग पा. घुले, यांच्यासह संगमनेर मधील विविध पदाधिकारी व हजारो नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा उद्देश हा रयतेच्या कल्याणासाठी होता. त्यांचे विचार हे जगासाठी सदैव प्रेरणादायी आहे. स्वराज्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्र नांदत होते जाती धर्मावरून कधीही भांडण झाले नाही. हा इतिहास आहे. मात्र सध्या समाजामध्ये वाढलेला भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार ,व्यसनधीनता, जाती जातींमध्ये होणारे भांडण, त्यावर होणारे राजकारण हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचबरोबर युवा पिढी भरकटली जात आहे. स्वराज्यामध्ये असे होते का. आणि आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांना काय वाटलं असतं हा विचार घेऊन प्रा.प्रकाश कुमार वाघमारे  व संगमनेरचे सुपुत्र डॉ. सागर फापाळे व 40 कलाकारांनी सादर केलेल्या या नाटकाने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले.

शेतकरी आत्महत्येच्या प्रसंगाने अंगावर काटा आणला तर महाराजांनी उभ्या केलेल्या गडकिल्ल्यांवर तरुणाई कडून होणारी जल्लोष बाजी अत्यंत चिंताजनक असल्याचे दर्शविले गेले. याचबरोबर जातीपातीच्या नावावर होणाऱ्या राजकारणातून समाजाची होणारी दुर्दशा दाखवली गेली.

आजच्या स्थितीत महाराज असते तर काय केले असते अत्यंत उद्दीग्न होऊन महाराजांनी जिरे टोपाचा आणि भवानी तलवारीचा केलेला त्याग हा प्रसंग प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारा ठरला.

याचबरोबर अफजल खान, प्रसंग शिवराज्याभिषेक, रांझा गावचा पाटील, शिवा काशीचे बलिदान आणि तानाजी मालुसरे ची झुंज हे प्रसंग पाहताना शिवप्रेमींनी शिवकाळाचा थरार अनुभवला.

अत्यंत भव्य दिव्य स्टेज, विद्युत रोषणाई, हुबेहूब इतिहासकालीन प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांचा जयजयकार आणि हजारो नागरिकांची उपस्थिती हे या महानाट्याचे वैशिष्ट्य ठरले.

प्रेक्षकांमधून होणारी सैन्याची एन्ट्री, महाराजांचे व्यासपीठावर आगमन, आणि अफजलखानाच्या प्रसंगाच्या वेळी झालेला जयघोष संस्मरणीय ठरला.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे. महाराजांच्या जीवनाचे अनेक पैलू सर्वांसाठी दिशादर्शक आहे. संकट काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन चरित्र हे मार्ग दाखवणारे आहे. महाराजांचे विचार प्रत्येकाने जपलेच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, फक्त जयंती साठी तरुणांनी पुढे न येता महाराजांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी काम केले पाहिजे. आजची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी महाराजांच्या विचारांची गरज असून हे  हे शिवकार्य वाढवण्यासाठी युवकांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या नाटकासाठी संगमनेर शहरातील हजारो नागरिक युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.