ताज्या घडामोडी

संगमनेरमध्ये मराठी भाषा गौरव दिन आणि सावरकर स्मृती दिनानिमित्त सांगितीक मैफिल : सौ.मंगल पेटकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आणि मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून नील स्वरसखी आणि नील स्वररत्न सुगम संगीत संस्थेच्या वतीने सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रसिक संगमनेरकरांच्या प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात अजरामर झालेली मराठी गाणी आणि कवितांचे सादरीकरण करण्यात आले. कवी सुरेश भट लिखित ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या गाजलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आजही कुणालाही स्फूर्ती देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ कवितेचे वाचन डॉ. माधवी गणोरे यांनी केले. ‘उठा उठा चिऊताई’ हे बालगीत सुमधुर आवाजात कु.वेदा काळे या बाल कलाकाराने सादर केले. सर्व स्वरसख्यांनी मिळून कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले, ‘ हसरा नाचरा जरासा लाजरा’ हे भावगीत सादर केले. त्यानंतर
डॉ. प्रमोद राजुस्कर यांनी मंदार जोग यांनी सावरकर यांच्यावरील लेखाचे वाचन केले. संगीत संस्थेच्या संस्थापिका सौ.निलंबरी कोर्टिकर यांनी ज्ञानेश्वरीतील विविध संदर्भ देऊन मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेबद्दल निवेदन केले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेला सुंदरी, साजिरी, सोज्ज्वळ, सर्वोत्तम,
शोभिवंत अशा अलंकारांनी तिचं सौंदर्य वाढवलं. जो पर्यंत चंद्रसूर्य आहेत तो पर्यंत आपली मराठी भाषा टिकणार आहे.आपण सर्वांनी पुढच्या पिढीसाठी मराठी भाषेचं जतन करावं. घरात मराठी भाषा बोलावी असेही त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले.
कार्यक्रमाच्या अखेरीस जयोस्तुते जयोस्तुते आणि ने मजसी ने परत मातृभूमीला ही मनामनात स्फुल्लिंग चेतावणारी गीते सादर झाली.
डॉ. ओंकार कोर्टिकर यांनी अभ्यासपूर्ण शैलीत दोन्ही दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या यज्ञात आहुती देणाऱ्या, प्रखर बुद्धिमत्ता आणि विज्ञाननिष्ठ अशा स्वातंत्र्यवीर सावरकर आणि परिवाराबद्दल माहिती सांगितली तेव्हा सर्व रोमांचित झाले. कवी कुसुमाग्रजांच्या ‘अनामवीरा’ या कवितेविषयी आणि ‘नटसम्राट’ या नाटकाच्या काही आठवणी सांगितल्या. कवी कुसुमाग्रजांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या गाण्याने कार्यक्रमाची सांगता झाली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.