आरोग्य व शिक्षण

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’

उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद; ३ हजार पत्रकारांनी घेतले श्री श्री रविशंकर यांच्याकडून ध्यानाचे धडे

मुंबई: पत्रकारितेचे क्षेत्र हे अत्यंत आव्हानात्मक, धावपळीचे आणि अनिश्चिततेने भरलेले असते. अहोरात्र बातम्यांचा पाठलाग, सततच्या डेडलाईन्स आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे पत्रकारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर मोठा ताण निर्माण होत आहे. ही गंभीर बाब ओळखून, पत्रकारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांना तणावमुक्त करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आणि ‘द आर्ट ऑफ लिविंग’ यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” हा १० दिवसांचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रभरातील तब्बल ३ हजार पत्रकारांनी एकत्र येत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि ध्यानाची प्रचिती घेतली. या विशेष सत्रात जागतिक स्तरावरील आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी राज्यातील पत्रकार बांधवांशी संवाद साधला आणि त्यांना धावपळीच्या युगात निरोगी राहण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना श्री श्री रविशंकर गुरुदेव म्हणाले की, “पत्रकार हा समाजाचा कणा असतो आणि समाजाला दिशा देण्याचे काम त्याच्या लेखणीतून होत असते. मात्र, हे कार्य करताना पत्रकारांचे स्वतःचे जीवन अत्यंत धावपळीचे झाले आहे. सतत बदलणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी आणि तातडीच्या जबाबदाऱ्यांमुळे मनावर आणि शरीरावर ताण येणे अत्यंत स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत मानसिक स्थैर्य आणि आंतरिक शांतता टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. यासाठी प्रत्येक पत्रकाराने दररोज किमान २० ते ३० मिनिटे ध्यान, प्राणायाम आणि पद्धतशीर श्वसनक्रिया (सुदर्शन क्रिया) करणे आवश्यक आहे. योग्य श्वसनामुळे रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुम्ही स्वतः मानसिकदृष्ट्या संतुलित आणि शांत असाल, तेव्हाच तुम्ही समाजाला अधिक चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकता आणि तटस्थपणे आपली भूमिका मांडू शकता.”
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक तुळशीदास भोईटे यांनी आपले अनुभव मांडताना सांगितले की, आजच्या कमालीच्या स्पर्धात्मक आणि डिजिटल युगात मेडिटेशन ही पत्रकारांसाठी चैन नसून ती काळाची अनिवार्य गरज बनली आहे. पत्रकारांना दररोज अनेक नकारात्मक, संवेदनशील आणि क्लेशदायक घटनांचा सामना करावा लागतो. या घटनांचा मनावर खोलवर परिणाम होत असतो. ध्यानामुळे हा साचलेला मानसिक ताण दूर होण्यास मोठी मदत होते, ज्यामुळे पत्रकार अधिक वस्तुनिष्ठपणे आणि आनंदाने आपले व्यावसायिक कर्तव्य बजावू शकतात. हा उपक्रम पत्रकारांच्या कार्यक्षमतेत वाढ करणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संचालक व्यंकटेश जोशी यांनी यावेळी नमूद केले की, या उपक्रमाला राज्यभरातून जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, ते पत्रकारांमध्ये आपल्या आरोग्याविषयी आणि मानसिक स्वास्थ्याविषयी निर्माण झालेल्या जागरूकतेचे मोठे प्रतीक आहे. ही केवळ एक सुरुवात असून पत्रकारांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तर संयोजक व संचालक गोरक्षनाथ मदने यांनी या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट करताना सांगितले की, “महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स” हा केवळ एक १० दिवसांचा कार्यक्रम नसून, ही पत्रकारांच्या सर्वांगीण विकासाची आणि स्वास्थ्याची एक मोठी लोकचळवळ बनत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशा आरोग्यकेंद्रित उपक्रमांचा विस्तार करण्याचा आणि प्रत्येक पत्रकार बांधवापर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. एकंदरीतच, या उपक्रमामुळे राज्यातील पत्रकार वर्गात एक नवी उमेद आणि सकारात्मक ऊर्जा संचारली असून संतुलित जीवनशैलीचा एक प्रभावी संदेश या माध्यमातून समाजात जात आहे.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.