हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांचा जागतिक सन्मान
नाशिकच्या डॉ. गौरव वर्मा यांना लंडनमध्ये जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित ‘अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप’ प्रदान

नाशिक (प्रतिनिधी): वैद्यकीय क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, इगतपुरी येथील एसएमबीटी (SMBT) चॅरिटेबल हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक आणि वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी “अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप” प्रदान करण्यात आली आहे. लंडन येथे ए.सी.एल. तर्फे आयोजित एका विशेष आंतरराष्ट्रीय सोहळ्यात डॉ. वर्मा यांना हा बहुमान देऊन गौरविण्यात आले. या सन्मानामुळे एसएमबीटी हॉस्पिटलमधील अत्याधुनिक हृदयोपचार सेवांच्या गुणवत्तेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्कामोर्तब झाले आहे.
इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँड्रियास ग्रुएंत्झिग यांनी जगात पहिली यशस्वी कोरोनरी अँजिओप्लास्टी करून हृदयविकार उपचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यांच्या या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा जपत, हृदयविकार शास्त्रामध्ये उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण योगदान देणाऱ्या जगभरातील निवडक तज्ज्ञांनाच ही फेलोशिप दिली जाते. लंडनमध्ये पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अँटोनियो कोलंबो आणि स्वित्झर्लंडमधील झुरिच येथील नामांकित तज्ज्ञ डॉ. बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ. वर्मा यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
डॉ. गौरव वर्मा यांनी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत गुंतागुंतीचे हृदयविकार, तावी (TAVI), रोटा, आयव्हस (IVUS) आणि कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी यांसारख्या प्रगत प्रक्रियांच्या माध्यमातून हजारो रुग्णांना नवजीवन दिले आहे. ग्रामीण भागात राहूनही जागतिक दर्जाची आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. या आंतरराष्ट्रीय गौरवामुळे उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, एसएमबीटी संस्थेच्या व्यवस्थापन समितीसह अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. वर्मा यांचे अभिनंदन केले आहे.

