आरोग्य व शिक्षण

लोकसहभागातून संगमनेरची ‘सह्याद्री शाळा’ १००% डिजिटल; माजी विद्यार्थ्यांच्या गुप्त दानाने शिक्षणाला लाभले नवे बळ

संगमनेर: प्रतिनिधी “अगोदर घरात उजेड करावा आणि नंतर देवळात दिवा लावावा,” हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार प्रत्यक्षात उतरवत संगमनेर येथील सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिराने लोकसहभागातून आधुनिकतेकडे झेप घेतली आहे. शाळा, समाज आणि पालक यांच्यातील उत्कृष्ट समन्वयामुळे ही शाळा आता १००% डिजिटल झाली असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा एक नवा आदर्श तालुक्यात निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी शाळेतील पालक व माजी विद्यार्थ्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. याच परंपरेतून राऊत परिवार व त्यांच्या नातेवाईकांनी शाळेला ६५ इंचांचा ‘इंटरॲक्टीव्ह डिजिटल पॅनल’ भेट दिला आहे. ही भेट म्हणजे केवळ एक तांत्रिक उपकरण नसून, भविष्यातील पिढीसाठी केलेली शैक्षणिक गुंतवणूक आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करताना तो मर्यादित आणि प्रत्यक्ष अनुभूती देणारा असावा, अशी महत्त्वाची भूमिकाही शाळा प्रशासनाने मांडली आहे.

या उपक्रमातील सर्वात प्रेरणादायी बाब म्हणजे एका माजी विद्यार्थ्याने दिलेले ‘गुप्त दान’. “प्रसिद्धीपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे” मानून या विद्यार्थ्याने सलग दुसऱ्या वर्षी शाळेला डिजिटल पॅनल भेट दिला आहे. या दातृत्वामुळे शाळेतील सर्व १२ वर्ग आता पूर्णपणे डिजिटल झाले असून, सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर हे ‘१००% डिजिटल इंटरॲक्टीव्ह क्लासरूम’ असणारी शाळा बनली आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या शुभमुहूर्तावर शाळेबद्दलची ही कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी पाहून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या डिजिटल क्रांतीमुळे शाळेतील सुमारे ६५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात मोठे परिवर्तन घडणार आहे. राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या ‘शैक्षणिक दान हेच श्रेष्ठ दान’ या विचारांची प्रेरणा घेत राबवलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापकांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहेत.


— मुख्याध्यापक, सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर, संगमनेर

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.