स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘विद्यार्थी गॅलरी’तून अनुभवले महाराष्ट्र विधानमंडळाचे कामकाज

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२६
केवळ पुस्तकी धडे न गिरवता लोकशाहीचे कामकाज प्रत्यक्ष कसे चालते, हे अनुभवण्यासाठी स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच महाराष्ट्र विधानमंडळाला भेट दिली. शाळेच्या अध्यक्षा डॉ. संज्योत वैद्य मॅडम यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा शैक्षणिक दौरा आयोजित करण्यात आला होता.
सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे औचित्य साधून ही भेट ठरवण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांच्या ‘विद्यार्थी गॅलरी’त बसून लोकप्रतिनिधींमधील चर्चा आणि प्रश्नोत्तरांचा तास मोठ्या उत्कंठेने अनुभवला. विशेषतः विधान परिषदेत जेव्हा अंगणवाडीच्या प्रश्नावर चर्चा रंगली होती, तेव्हा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरांनी विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले. सभागृहात लोकहिताचे प्रश्न कसे मांडले जातात आणि शासन त्यावर कशा प्रकारे उत्तरदायी असते, याचे जिवंत शिक्षणच जणू या निमित्ताने विद्यार्थ्यांना मिळाले.
पुस्तकात वाचलेली विधानसभा आणि प्रत्यक्ष चालणारे कामकाज यातील फरक पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. “सभागृहातील शिस्त, चर्चा आणि विविध सामाजिक प्रश्नांची मांडणी पाहून आम्हाला शासन व्यवस्थेची व्याप्ती खऱ्या अर्थाने उमजली,” अशा भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान शाळेच्या अध्यक्षा डॉ. संज्योत वैद्य मॅडम आणि शिक्षकही विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकशास्त्राची गोडी निर्माण होऊन भविष्यात ते एक जबाबदार नागरिक म्हणून घडतील,” असा विश्वास डॉ. संज्योत वैद्य यांनी यावेळी व्यक्त केला. विधानभवनातील कामकाज अनुभवल्यानंतर विद्यार्थ्यांनी मुंबईची ओळख असलेल्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडियालाही भेट दिली. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


