ताज्या घडामोडी

सलग ४२ व्या अधिवेशनानंतर छात्र भारतीची धुरा संगमनेरच्या सुपुत्राकडे; शहरात भव्य नागरी सत्कार.

संगमनेर (वृत्तसेवा): मुंबईत पार पडलेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या मोठ्या यशाबद्दल संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न झाला. पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. सुधीर तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती यांसारख्या संघटना पुरोगामी विचारांची आणि भक्कम वैचारिक बैठक असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तर, छात्र भारती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने लढा देत असल्याचा गौरव राष्ट्र सेवा दलाचे नेते सीताराम राऊत यांनी केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रुपवते यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच, शिक्षक नेते हिरालाल पगडाल यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर परखड भाष्य करताना, आपण नेहमीच विवेकी विचारांच्या पाठीशी उभे राहिलो असून प्रसंगी काँग्रेसच्या विरोधातही भूमिका घेण्यास मागे-पुढे पाहिले नाही, अशी स्पष्ट आठवण करून दिली.

सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त अध्यक्ष अनिकेत घुले यांनी संघटनेची पुढची दिशा स्पष्ट केली. “छात्र भारती ही गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्यभर लढणारी संघटना आहे. आज शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठी आव्हाने उभी आहेत, मात्र अशा परिस्थितीत कोणत्याही दबावाला बळी न पडता संघटना विद्यार्थी हितासाठी जोमाने काम करेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष राजा कांदळकर, नगराध्यक्षा मैथिलीताई तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते, कॉ. कारभारी उगले, हिरालाल पगडाल, सीताराम राऊत, रोहित ढाले, समीर लामखडे, संदीप काकड, राम चन्ना, मोहम्मद कैफ, राजाभाऊ अवसक, रंजना गवादे, उल्हास पाटील, अजय फटांगरे, चंद्रकांत घुले, रवी दिवे, अनुराधा आहेर आणि राहुल जऱ्हाड यांच्यासह विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी छात्रभारतीच्या इतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.