कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; कामचुकार ठेकेदारांवर थेट कारवाईचे संकेत आमदार अमोल खताळ यांची स्पष्ट भूमिका

संगमनेर (प्रतिनिधी) –
तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांना जाणीवपूर्वक खोळंबा घालणाऱ्या आणि अपूर्ण कामांमुळे नागरिकांना त्रास देणाऱ्या ठेकेदारांवर आता कठोर पावले उचलली जाणार आहेत. कामात हलगर्जीपणा, निकृष्ट दर्जा आणि दिरंगाई करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे ठाम निर्देश आमदार अमोल खताळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पायाभूत विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. काही ठेकेदारांनी मक्तेदारी निर्माण करत एकाच वेळी अनेक कामे उचलली, मात्र ती वेळेत पूर्ण न केल्याने सामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विशेषतः नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाकडे जाणारा निळवंडे–जांभुळवाडी फाटा, वडगावपान फाटा–तळेगाव–अकोले मार्ग तसेच शहरातील एलआयसी इमारतीलगतचा रस्ता हे अत्यंत महत्त्वाचे मार्ग असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
महायुती सरकारकडून विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असतानाही ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्या ठेकेदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत, त्यांचे सविस्तर अहवाल तयार करून संबंधित कामांच्या पुनर्निविदा काढण्याचे आदेश त्यांनी दिले. दर्जेदार काम आणि वेळेचे पालन झालेच पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
विकासकामांमध्ये येणाऱ्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम पाठीशी राहू, असा विश्वास आमदार खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, उपविभागीय अभियंता काशिनाथ गुंजाळ, गटविकास अधिकारी प्रशांत सिनारे यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







