ताज्या घडामोडी

संगमनेरमध्ये पत्रकारांचा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मान

संगमनेर | प्रतिनिधी

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत संगमनेर येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वा.  मालपाणी रिसॉर्ट, संगमनेर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात संगमनेर व अकोले तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पत्रकारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व वास्तव परिस्थिती समजून घेतली. अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेपासून ते आर्थिक, आरोग्य व निवासाशी संबंधित प्रश्न स्पष्टपणे मांडले. या सर्व समस्यांवर सकारात्मक पातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा ठाम विश्वास खासदार वाकचौरे यांनी उपस्थित पत्रकार बांधवांना दिला.

यावेळी बोलताना त्यांनी पत्रकार भवनासाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन देत पत्रकारितेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली. “लोकशाहीत पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ मजबूत राहण्यासाठी शासनस्तरावर अधिक संवेदनशील व दीर्घकालीन धोरणांची आवश्यकता आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास संगमनेर व अकोले तालुक्यातील ज्येष्ठ, अनुभवी तसेच नव्या पिढीतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आज डिजिटल युगात पत्रकारितेचे स्वरूप बदलत असताना पत्रकारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना अधिक परिणामकारकपणे कशा राबवता येतील, यावर सखोल विचार होणे काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर येथे झालेला हा सन्मान सोहळा केवळ गौरवापुरता मर्यादित न राहता, पत्रकारितेच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरला, असेच म्हणावे लागेल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.