आरोग्यसेवेतून लोकसेवेकडे : नगरसेवक डॉ. अनुराधाताई निलेश सातपुते यांचा सत्कार
युवा नेतृत्वाच्या सन्मानाने सर्वत्र आनंदाची लाट..

संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक निकालानंतर शहराच्या राजकीय व सामाजिक वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकपदी निवडून आलेल्या डॉ. अनुराधाताई निलेश सातपुते यांचा डॉ. निलेश सातपुते मित्र परिवार यांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. अनुराधाताई सातपुते यांनी आपल्या वैद्यकीय सेवेतून सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधत समाजसेवेचा वसा जपला आहे. आता संगमनेर नगर परिषदेत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या अनुभवाचा थेट उपयोग शहराच्या सर्वांगीण विकासासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत अधिक संवेदनशील, परिणामकारक व लोकाभिमुख भूमिका त्या बजावतील, असा विश्वास संगमनेरकरांमध्ये व्यक्त होत आहे.
या सत्कार समारंभास निमा संगमनेरचे सेक्रेटरी डॉ. सौरभ गीते, साप्ताहिक युवादृष्टीचे संपादक सागर पन्हाळे, पूर्णवादी बँकेचे प्रमोद बेहेरे यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते. यावेळी डॉ. अनुराधाताई सातपुते यांच्या पुढील सार्वजनिक, सामाजिक व विकासाभिमुख वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
शहराच्या विकास प्रक्रियेत तरुण, अभ्यासू व कार्यक्षम नेतृत्वाला संधी मिळणे ही संगमनेरकरांसाठी आशादायी बाब मानली जात असून, डॉ. अनुराधाताई सातपुते यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त केले जात आहे.







