कृषीवार्ता

“मियावाकी जंगलातून हरित महाराष्ट्राची नवी दिशा”

डॉर्फ केटल जंगल कप 2.0 चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा संगमनेरमध्ये उत्साहात

संगमनेर, दि. २७ फेब्रुवारी २०२६ (प्रतिनिधी):
निसर्ग संवर्धनासाठी शासन, समाज आणि उद्योग क्षेत्र एकत्र आले तर मोठे परिवर्तन घडू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण ‘डॉर्फ केटल जंगल कप 2.0’ च्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात पाहायला मिळाले. Dorf Ketal Chemicals India Limited यांच्या CSR उपक्रमातून, सप्रेम संस्था (SAPREM) व नवदृष्टी संस्था यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या या अभिनव मियावाकी वृक्षलागवड स्पर्धेमुळे राज्यात हरित चळवळीला नवी दिशा मिळत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील Dhole Patil Lawns येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास राजस्थानचे प्रख्यात जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, पद्मश्री चैतराम पवार, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, सामाजिक कार्यकर्त्या नताशा मिश्रा, सिमंतिनी कोकाटे, गटविकास अधिकारी संदीप वायाळ तसेच सप्रेम संस्थेचे पदाधिकारी व विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एका गुंठ्यात ४२ प्रजातींची ३०० देशी झाडे

मियावाकी पद्धतीनुसार एका गुंठा जागेत सुमारे ४२ प्रजातींची ३०० देशी झाडे एकत्र लावली जातात. झाडांची घनदाट लागवड केल्यामुळे त्यांच्यात नैसर्गिक वाढीची स्पर्धा निर्माण होते आणि अवघ्या २ ते ३ वर्षांत जैवविविधतेने समृद्ध असे दाट जंगल तयार होते. या उपक्रमामुळे गावोगावी वृक्षसंवर्धनाची चळवळ उभी राहत असून आतापर्यंत महाराष्ट्रातील १५५ हून अधिक गावांमध्ये मियावाकी जंगले उभी राहिली आहेत.

विजेते ग्रामपंचायती

डॉर्फ केटल जंगल कप 2.0 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्रथम क्रमांक (₹१,००,०००): सोनेवाडी (ता. संगमनेर)

द्वितीय क्रमांक (₹७५,०००): लहित खुर्द (ता. अकोले)

तृतीय क्रमांक (₹५०,००० – विभागून): कुसूर (ता. येवला) व डोंगरगाव (ता. कारंजा, जि. वाशिम)

तसेच उंबरडा (ता. कारंजा, जि. वाशिम), रेंडाळे व विसापूर (ता. येवला), तसेच मालदाड, निळवंडे आणि साकूर (ता. संगमनेर) या ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

“निसर्ग संवर्धन करणाऱ्यांना निसर्गाचा सन्मान” – डॉ. राजेंद्र सिंह

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, “हा पुरस्कार म्हणजे निसर्ग संवर्धन करणाऱ्यांना निसर्गाकडून मिळालेला सन्मान आहे.” पृथ्वीवरील हिरवळ नष्ट झाल्यास पावसाचे चक्र विस्कळीत होते आणि दुष्काळ व अतिवृष्टीसारखी संकटे वाढतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंबळ खोऱ्यातील जलसंवर्धनाच्या कार्याचा दाखला देताना त्यांनी सांगितले, “त्या बंदुका मी नाही सोडवल्या, त्या बंदुका पाण्याने सोडवल्या.” जलसंवर्धनामुळे समाजात मोठे परिवर्तन घडू शकते, असा संदेश त्यांनी दिला.

“झाडांकडून शिकण्याची गरज” – संतोष जगधने

Dorf Ketal कंपनीचे CSR प्रमुख संतोष जगधने यांनी सांगितले की, मियावाकी जंगलात ४०-४५ प्रजातींची झाडे कोणताही भेदभाव न करता एकत्र वाढतात. झाडांना फक्त देणेच माहिती असते. माणसानेही झाडांकडून सहकार्य आणि देण्याची वृत्ती शिकण्याची गरज आहे.

“शासन-समाज-कॉर्पोरेट एकत्र आले तर बदल शक्य” – आनंद भंडारी

जिल्हा परिषद सीईओ आनंद भंडारी यांनी सांगितले की, जलसंधारण, पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रात डॉर्फ केटल, सप्रेम आणि नवदृष्टी संस्था कार्य करत आहेत ही आनंदाची बाब आहे. शासन, समाज, सेवाभावी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्र एकत्र आले तर सकारात्मक बदल वेगाने घडू शकतो.

“आजचे विजेते उद्याचे मार्गदर्शक” – डॉ. प्रकाश गायकवाड

सप्रेम संस्थेचे डॉ. प्रकाश गायकवाड यांनी विजेत्या गावांचे अभिनंदन करत सांगितले की, आजचे विजेते गाव उद्याचे मार्गदर्शक ठरतील. ही हरित चळवळ महाराष्ट्रातील प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.