आरोग्यदायी सेंद्रिय गुळ आणि आयुर्वेदाचा संगम; कळस कृषी प्रदर्शनात सेंद्रिय गुळ स्टॉलचे उद्घाटन

संगमनेर प्रतिनिधी – आरोग्य, आयुर्वेद आणि सेंद्रिय शेती यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळत असून संगमनेर येथे सुरू असलेल्या श्री कळस कृषी प्रदर्शनात सेंद्रिय गुळ उत्पादनांचा विशेष स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या स्टॉलचे उद्घाटन NIMA आयुर्वेद फोरमचे अध्यक्ष डॉ. अतुल देशमुख, नॅशनल इंटिग्रॅटेड मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सौरभ गिते तसेच डॉ. स्मिता देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
या स्टॉलवर आयुर्वेदाच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सेंद्रिय गुळाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. नैसर्गिक ऊसापासून तयार होणारा हा गुळ पूर्णपणे रसायनमुक्त असून पचनक्रिया सुधारण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि दैनंदिन आहारात आरोग्यदायी पर्याय म्हणून उपयुक्त ठरत आहे. उत्पादन प्रक्रियेत स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्यात येत असल्याने दर्जेदार गुळ ग्राहकांसाठी उपलब्ध झाला आहे.
सुगावच्या लोकनियुक्त सरपंच वैद्य सौ. अनुप्रिता शिंदे आणि सेंद्रिय गुळ उत्पादक श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळत असून स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळत आहे.
हे कृषी प्रदर्शन १३ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी सेंद्रिय गुळाची गुणवत्ता अनुभवण्यासाठी या स्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे आयोजन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय, संगमनेर येथे करण्यात आले आहे.
