संगमनेरच्या क्रीडा क्षितिजावर ‘शॉटी व्हॉलीबॉल’चा थरार; ३२ पारितोषिकांसाठी राज्यभरातील संघ भिडणार!
मालपाणी बंधूंच्या स्मृतींना खेळाच्या माध्यमातून अभिवादन; ७ फेब्रुवारीपासून रणसंग्राम

संगमनेर: प्रतिनिधी सहकार आणि शैक्षणिक चळवळीचे केंद्र असलेल्या संगमनेर शहरात पुन्हा एकदा क्रीडा महोत्सवाचा बिगुल वाजणार आहे. ‘दि व्हॉलीबॉल क्लब, संगमनेर’ यांच्या वतीने स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी व स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय ‘शॉटी’ व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी मालपाणी लॉन्सच्या मैदानावर हा रोमांचक सोहळा पार पडणार असून, राज्यभरातील साठ संघ तसेच इतर राज्यातील पाच ते सहा मातब्बर संघ या विजेतेपदासाठी आपली ताकद पणाला लावणार आहेत.
क्रीडा संस्कृतीचे जतन, संवर्धन तसेच संगमनेरच्या सामाजिक जडणघडणीत मालपाणी परिवाराचे योगदान मोठे आहे. स्वर्गीय ओंकारनाथ मालपाणी आणि स्वर्गीय माधवलाल मालपाणी यांनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. त्यांचा हाच वारसा पुढे चालवत ‘दि व्हॉलीबॉल क्लब’ने या भव्य स्पर्धेचे नियोजन केले आहे. ‘शॉटी’ व्हॉलीबॉल हा प्रकार महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल खेळ मानला जातो. वेगवान हालचाली, चपळता आणि अचूक टॅपिंग यामुळे हा खेळ प्रेक्षकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
खेळाडूंच्या नैपुण्याला योग्य न्याय मिळावा आणि त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, या उद्देशाने आयोजकांनी यंदा ३२ विविध प्रकारची पारितोषिके जाहीर केली आहेत. केवळ विजेत्या संघालाच नव्हे, तर वैयक्तिक पातळीवर चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरविण्यात येणार आहे. अशा व्यापक स्वरूपामुळे या स्पर्धेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, मुंबई, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक नामवंत संघ यात सहभागी होणार आहेत.
या भव्य उद्घाटन स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ शनिवार, दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता मालपाणी लॉन्स येथे एका दिमाखदार सोहळ्यात होणार आहे. याप्रसंगी राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रात्रीच्या प्रकाशझोतातही काही सामने खेळवले जाणार असल्याने संगमनेरकरांना क्रीडा मेजवानी मिळणार अशी माहिती या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक मनीषभाऊ मालपाणी यांनी दिली .तसेच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी खेळाडू संगमनेरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी तसेच हॉलीबॉलप्रेमी, सर्व मान्यवर यांनी जे आर्थिक योगदान दिले त्या सर्वांचे दि .हॉलीबॉल क्लबच्या सर्व सदस्यांच्या वतीने आभार .
