क्रीडा जगत

सहकारमहर्षी टी-२० चषक २०२६ : पुण्याच्या एनबीसीसी संघाने उंचावला विजयी झेंडा

सुमारे दहा हजार प्रेक्षकांच्या साक्षीने पारितोषिक वितरण, खेळाडू–आयोजकांचा गौरव

संगमनेर (प्रतिनिधी) — शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला सामना, स्टेडियममध्ये उसळलेला जल्लोष आणि मैदानावर दिसलेली उच्च दर्जाची क्रिकेटची झलक… अशा वातावरणात सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट चषक २०२६ चा मानकरी ठरला एनबीसीसी पुणे संघ. मुंबई संघाने दिलेले २०० धावांचे आव्हान पुण्याने आत्मविश्वासाने पार करत चषकावर आपले नाव कोरले.

भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात पार पडलेल्या या अंतिम सामन्याला तब्बल १९ रणजी व आयपीएल खेळाडूंची उपस्थिती लाभली होती. सुमारे दहा हजार क्रिकेटप्रेमी प्रेक्षकांनी सामना अनुभवत संगमनेरला पुन्हा एकदा क्रिकेटनगरी बनवले.

मुंबईची दमदार सुरुवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ मांडला. सागर मिश्रा याने खेळलेली ६६ धावांची खेळी प्रेक्षकांची दाद मिळवणारी ठरली. निर्धारित वीस षटकांत मुंबईने २०० धावांचा भक्कम स्कोअर उभा केला.

पुण्याची संयमी पण धडाकेबाज उत्तर

लक्ष्य मोठे असले तरी पुणे संघाचा आत्मविश्वास ढळला नाही. धीरज फटांगरे याने ८८ धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. कर्णधार अजीज काझी याने नाबाद ६७ धावा करत डाव सांभाळला. शेवटच्या टप्प्यात विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा प्रीतम पाटीलने सलग तीन षटकार ठोकत पूर्ण केल्या आणि पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

सन्मान, बक्षिसे आणि गौरव

उत्कृष्ट कामगिरीसाठी धीरज फटांगरेला ‘मॅन ऑफ द मॅच’, तर संपूर्ण स्पर्धेत सातत्य राखणाऱ्या अमित यादवला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्काराने गौरवण्यात आले. विजेत्या पुणे संघाला तीन लाख रुपये, तर उपविजेत्या मुंबई संघाला दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

क्रिकेट म्हणजे एकत्र येण्याचा उत्सव

पारितोषिक वितरणप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी क्रिकेटच्या सामाजिक भूमिकेवर भर देत सांगितले की, “हा खेळ जात, धर्म, भाषा विसरून माणसांना एकत्र आणतो. सहकारमहर्षी चषकाची ही परंपरा संगमनेरच्या क्रीडा संस्कृतीचे प्रतीक आहे.”

आमदार सत्यजित तांबे यांनीही क्रीडा संकुलाच्या विकासाबाबत भूमिका मांडत, भविष्यात अधिक दर्जेदार स्पर्धा संगमनेरमध्ये आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

खेळाडू, आयोजक आणि युवकांचे योगदान

या स्पर्धेच्या यशामागे आयोजक, प्रायोजक, स्वयंसेवक आणि युवक कार्यकर्त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या मेहनतीमुळेच सहकारमहर्षी टी-२० चषकाने यंदा नवा उंचीचा टप्पा गाठला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.