शैक्षणिक विशेष

शेकोटी व हुरडा उत्सव – ग्रामीण संस्कृतीचा जिवंत उत्सव!

परंपरा जपूया, संस्कृती जोपासूया

थंडीच्या गार वाऱ्यात उबदार शेकोटीची ऊब आणि मायेच्या नात्यांत गुंफलेली आपली माणसं — याच भावविश्वात शेकोटी व हुरडा उत्सव हा ग्रामीण संस्कृतीचा जिव्हाळ्याचा आणि आनंददायी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरा, संस्कृती आणि सामूहिक आनंद यांचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय वर्पे यांनी केले. शेकोटी म्हणजे केवळ आगीचा ज्वाळाच नव्हे, तर ती एकोप्याची, संवादाची आणि संस्कारांची ज्योत असून, हुरडा हा शेतकऱ्याच्या कष्टांचा गोड सण असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. अशा परंपरा जपत आजचा हा आनंदसोहळा साजरा करीत असल्याचा भाव त्यांनी व्यक्त केला.

भारतीय संस्कृतीतील “अतिथी देवो भवः” या परंपरेनुसार उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर शेकोटी प्रज्वलन सोहळा उत्साहात पार पडला. हे प्रज्वलन संगमनेर शहराच्या सप्तपदीच्या मार्गदर्शिका, प्रथम लोकनियुक्त व महिला नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, पुरोगामी विचारांचे तरंग व दंडकारण्य अभियानातील पहाडी आवाज म्हणून ओळखले जाणारे स.ब.वि.प्र.समाज संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रा. बाबा खरात सर, डिजिटल क्लासरूमचे ब्रँड ॲम्बेसेडर व आजचे अन्नदाते संदिप ऊर्फ दुर्गेश कडलग साहेब, जयदेव वर्पे, पालक व चिमुकल्या बालगोपाळांच्या हस्ते संपन्न झाले.

मकरसंक्रांतीच्या सुमारास पेटवली जाणारी शेकोटी ही ऊब, ऐक्य आणि नवचैतन्याचे प्रतीक मानली जाते. प्राचीन काळापासून शेकोटीभोवती कुटुंब, मित्रपरिवार आणि समाज एकत्र येऊन संवाद, गाणी, खेळ व अनुभवांची देवाणघेवाण करीत आले आहेत. याच परंपरेचे जिवंत दर्शन या कार्यक्रमातून घडले.

यानंतर हुरड्याचा आस्वाद सर्वांनी घेतला. ताज्या हिरव्या ज्वारीपासून बनवलेला हुरडा हा शेतकरी संस्कृतीशी नाळ जोडणारा ग्रामीण जीवनाचा खास स्वाद आहे. शेतात पिकलेल्या ज्वारीचा पहिला आस्वाद घेणे म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे व शेतकऱ्याच्या परिश्रमांचा सन्मान करण्याचा सुंदर सोहळा असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. गरमागरम हुरडा, झणझणीत चटणी आणि आपुलकीचा स्वाद यामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

या उबदार वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांतून चिमुकल्या कलाकारांनी आपली कला सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. तसेच खेळ व विविध उपक्रमांमुळे सहभागी होण्याचा उत्साह सर्वांमध्ये दिसून आला. शेकोटीभोवती बसून खेळणे, हसणे आणि संवाद साधणे यातच या सणाचा खरा आनंद अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया जाधव व अर्चना धिमते यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका शामल धिमते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे, शिक्षकांचे, पालकांचे व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.

आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगातही अशा परंपरा जपणे व पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्य असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. शेकोटीच्या उष्णतेत आणि हुरड्याच्या चवीतून आपली माती, आपली माणसे आणि आपली संस्कृती जिवंत ठेवणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

SHARE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.