अमृतवाहिनी आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशी संधी; दुबईतील नामांकित कंपनीत सहा जणांची निवड

संगमनेर (प्रतिनिधी) – गुणवत्ताधारित शिक्षण आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची परंपरा जपणाऱ्या अमृतवाहिनी आयटीआय ने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली आहे. संस्थेतील इलेक्ट्रिशियन व फिटर ट्रेडमधील सहा विद्यार्थ्यांची दुबई येथील नामांकित कंपनीत आकर्षक वेतनावर निवड झाली आहे. ही निवड माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचे फलित असल्याचे प्राचार्य विलास भाटे यांनी सांगितले.
दुबईतील जी बी एम टी स्टील सर्विसेस या कंपनीने अमृतवाहिनी आयटीआयमध्ये थेट कॅम्पस इंटरव्ह्यू आयोजित केला होता. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर सतीश खुळे आणि प्रोडक्शन हेड प्रमोद आवारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, शिस्त आणि कामातील तयारी पाहून कंपनीने सहा विद्यार्थ्यांची निवड निश्चित केली.
कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे ग्रामीण भागातील तरुणांना थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळत असून अमृतवाहिनी आयटीआयचे नाव आता देशाबाहेरही पोहोचत आहे. ही निवड केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण संस्थेसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर प्रा. विवेक धुमाळ, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य विलास भाटे तसेच नामदेव गायकवाड यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



