हिवरगाव पावसा येथे सांस्कृतिक कार्यक्रमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मानवंदना
कला सम्राज्ञी पवळा कलामंचाच्या पुढाकारातून संवाद्य मिरवणूक; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग


संगमनेर | प्रतिनिधी – नितीनचंद्र भालेराव
संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कला, लोकसंवाद आणि प्रबोधनाच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. कला सम्राज्ञी पवळा कला मंच व ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पारंपरिक सवाद्य मिरवणुकीसह शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले.
देवगड माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. कला मंचाचे कलावंत कवी-गायक हरिश्चंद्र भालेराव व शाहीर मधुकर भालेराव यांनी लोककला, पोवाडे व प्रबोधनात्मक गीतांतून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन केले. या गीतांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत वाजत-गाजत संपूर्ण गावातून मिरवणूक काढली. भाषणे व गीतांमधून स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. “शिक्षणामुळे स्त्रीला माणूस म्हणून सन्मान मिळतो”—हा संदेश विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणांतून अधोरेखित केला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त शिक्षक प्रा. बाबुराव पावसे यांनी सांगितले की, आज मुली शिक्षणातच नव्हे तर विविध क्षेत्रांत यशाची शिखरे गाठत आहेत; हीच सावित्रीबाई फुले यांना दिलेली खरी आदरांजली आहे. सरपंच सुभाष गडाख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक सुधारणांचे कार्य—स्त्री शिक्षण, सतीप्रथा बंदी, विधवा मुंडनाला विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृह, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीचे प्रयत्न—यांचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमास सरपंच सुभाष गडाख, देवगड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रमेश पावसे, ज्येष्ठ संपादक यादवराव पावसे, जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर. पी. राहणे, ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर पावसे, कला मंचाचे सचिव नितीनचंद्र भालेराव, अण्णासाहेब गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीनचंद्र भालेराव यांनी केले. कला सम्राज्ञी पवळा कला मंच व महात्मा फुले–डॉ. आंबेडकर–राजर्षी शाहू विचारमंच यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जि.प. प्राथमिक शाळेतील शिक्षक हरिभाऊ सहाने, श्रीमती मीनल बिडवे, देवगड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा उगले, तसेच ग्रामस्थांनी सहकार्य केले. अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



