दि हॉलीबॉल क्लबतर्फे ५ ते ७ जानेवारीला अंतर्गत हिवाळी हॉलीबॉल स्पर्धा; २७ वर्षांची परंपरा यंदाही कायम

संगमनेर | प्रतिनिधी
दि हॉलीबॉल क्लबच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी अंतर्गत हिवाळी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा ५, ६ आणि ७ जानेवारी २०२६ रोजी मालपाणी लॉन्स येथे पार पडणार आहे, अशी माहिती क्लबचे अध्यक्ष श्री. चिंतन शाह यांनी दिली. गेल्या जवळपास २७ वर्षांपासून मालपाणी परिवाराच्या सहकार्याने या स्पर्धेचे सातत्याने आयोजन होत असून, ही स्पर्धा शहरातील क्रीडापरंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे.
या स्पर्धेत क्लबमधील अंतर्गत पाच संघांचा समावेश करण्यात येणार असून प्रत्येक संघात सहा खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेदरम्यान साखळी व बाद फेरीच्या सामन्यांद्वारे विजेता आणि उपविजेता संघ निश्चित केला जाणार असून, त्यांना मानाची ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या सामन्यांमध्ये आजी-माजी खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग असून, त्यांच्या उपस्थितीमुळे नव्या पिढीतील खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेत माजी खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरून किंवा उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवत असतात. रात्री ९ ते ११ या वेळेत नियमितपणे हॉलीबॉल खेळणाऱ्या सदस्यांमधूनच या स्पर्धेची संकल्पना साकारली गेली असून, व्यस्त दिनचर्या आणि मोबाईल युगाच्या पार्श्वभूमीवरही खेळाला प्राधान्य देणाऱ्या या खेळाडूंचे हे आयोजन प्रेरणादायी ठरत आहे.
क्रीडासंस्कृती जपणारी ही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी सर्व माजी खेळाडूंनी या स्पर्धेस आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन दि हॉलीबॉल क्लबच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ स्पर्धात्मक नसून मैत्री, आरोग्य आणि खेळाची आवड जपणारा एक क्रीडोत्सव ठरणार आहे.







