
संगमनेर :
सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर, संगमनेर येथे इयत्ता दुसरी व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा “स्वधा महोत्सव” हा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे व सर्जनशीलतेला चालना देणे , हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीत, अभिनय व विविध कलाप्रकारांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर पालकांकडून फुल ना फुलाची पाकळी देत बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला. यावरून या महोत्सवाबाबत पालकांचा वाढता सहभाग व उत्साह स्पष्टपणे दिसून आला.
“वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देणे” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात शाळेचे ब्रीदवाक्य “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” प्रत्यक्ष कृतीतून साकार झाले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे व त्यांचा सर्वांगीण विकास साधणे, हे शाळेचे धोरण या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
“मा.प्रशासकीय अधिकारी आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत शिक्षणक्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शक, शिक्षक ते गटशिक्षणाधिकारी पद भूषवलेले सन्मा.डी. डी. वाकचौरे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची आवश्यकता, मोबाईलचे दुष्परिणाम तसेच शासनाचा नवीन विद्यार्थी सुरक्षा कायदा याविषयी त्यांनी प्रभावीपणे प्रबोधन केले.
याप्रसंगी सन्मा. प्राचार्य एस. एम. खेमनर (भा. गुं. पा. सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज) तसेच सन्मा. प्राचार्य ॲड. संजय दारोळे (अमृतेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, संगमनेर खुर्द) यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण सराव व शिस्तीचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. उपमुख्याध्यापिका दिघे मॅडम, पर्यवेक्षिका संगिता रणशूर मॅडम तसेच रुपाली गुंजाळ, शरयु गणेश सोनवणे, सपना गुंजाळ, स्मिता देशमुख, रोहिणी भोजणे,अनुराधा श्रीमंदिलकर यांनी पालक प्रतिनिधी म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
संस्थेचे मार्गदर्शक मा. महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात तसेच चेअरमन मा. आमदार डॉ. सुधीरजी तांबे साहेब यांनी स्वधा महोत्सवास विशेष शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय वर्पे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपत गंभिरे व स्वतः यांनी केले, तर आभारप्रदर्शन विजया आदमाने यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर, संगमनेर. पालक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.







