सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिरात २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘स्वधा महोत्सव’; तीन दिवस चिमुकल्यांच्या कलाविष्कारांचा उत्सव
“स्वधा महोत्सव” म्हणजे केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणारा आनंदाचा, आत्मविश्वासाचा आणि प्रेरणेचा उत्सव…!

संगमनेर | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत आत्मविश्वास, संस्कार आणि सर्जनशीलतेची पेरणी करणारा ‘स्वधा महोत्सव’ सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर, संगमनेर येथे २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या तीनदिवसीय सांस्कृतिक उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले असून, प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वर्गांचे सादरीकरण होणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, सोमवार २९ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांचे गीत, नृत्य, नाट्यछटा व विविध सांस्कृतिक सादरीकरण होणार आहे. मंगळवार, ३० डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांचे कलाविष्कार, अभिव्यक्तीप्रधान कार्यक्रम आणि गुणदर्शन सादर केले जाणार आहे. तर महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी, बुधवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता बालवाडी विभागातील चिमुकल्यांचे सांस्कृतिक सादरीकरण व गुणगौरव समारंभ पार पडणार आहे.
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्यानुसार सर्वसमावेशक शिक्षणाची भूमिका जपत आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मंच मिळावा, त्याच्या क्षमतेला दाद मिळावी आणि आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
हा तीनदिवसीय ‘स्वधा महोत्सव’ सह्याद्री प्राथमिक विद्या मंदिर, ए.डी.सी.सी. बँकेजवळ, पुणे हायवे, संगमनेर येथे होणार असून, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळा प्रशासन व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.







