ताज्या घडामोडी

मतमोजणीमुळे संगमनेरमध्ये ‘नो एन्ट्री’; नागरिकांसाठी वाहतुकीचे नवे नियम

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या, रविवारी २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. प्रशासनाने अनेक प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी ही माहिती लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतमोजणी सुरू झाल्यापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईदगाह मैदान ते नेहरू गार्डन हा मुख्य मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच शहर पोलीस स्टेशन ते संजय गांधी नगर या मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात येऊन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वकील कॉलनी आणि अभंग मळा परिसरातून क्रीडा संकुलाकडे जाणारे सर्व अंतर्गत रस्तेही बंद ठेवण्यात येणार असून, बॅडमिंटन हॉल कोपरा आणि क्रीडा संकुल गेट क्रमांक एक येथे कडक नाकाबंदी करण्यात येणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेदरम्यान उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवार आणि प्रतिनिधींनी आपली वाहने पेटीट कॉलेज आणि सिद्धार्थ हायस्कूलच्या मैदानातच उभी करावीत. सिद्धार्थ हायस्कूलकडे जाताना शहर पोलीस स्टेशन, संजय गांधी नगर आणि सिद्धार्थ शाळा गेट हा मार्गच वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कवी अनंत फंदी समोरील बेसमेंट, तहसील कार्यालय परिसर तसेच प्रशासनाने निश्चित केलेली इतर पार्किंग ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

मतमोजणी केंद्रात प्रवेश करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेले वैध ओळखपत्र असणे बंधनकारक राहणार आहे. मोबाईल फोन, स्वतःचे पेन, कागद किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणे केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नोंदीसाठी आवश्यक पेन आणि लेखन साहित्य प्रशासनाकडूनच उपलब्ध करून दिले जाणार असून, त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्ताअंतर्गत कडक सुरक्षा तपासणीनंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

नागरिकांना फेरिनिहाय निकालाची माहिती मिळावी यासाठी प्रशासनाने शहरातील चार ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा बसवली आहे. बॅडमिंटन हॉल बाहेरील परिसर, ईदगाह मैदान परिसर, क्रीडा संकुल गेट क्रमांक एक आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशन समोर निकालाची माहिती जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे तसेच पोलीस प्रशासनाने नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.