ताज्या घडामोडी
महाराष्ट्र पोलीस भरतीची मैदानी चाचणी लांबली! महापालिका निवडणुकीचा परिणाम, नवीन तारखा लवकरच

महाराष्ट्र राज्य पोलिस दलासह कारागृह विभागातील शिपाई संवर्गात सुमारे पंधरा हजार रिक्त पदांसाठी होणाऱ्या भरतीप्रक्रियेत लाखो उमेदवारांनी अर्ज सादर केल्यानंतर मैदानी चाचणीच्या सरावाला सुरुवात झाली आहे. मात्र, राज्यातील महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने मैदानी चाचणीचे नियोजन लांबण्याची शक्यता आहे.
बंदोबस्त, कायदा व सुव्यवस्थेमुळे हा निर्णय होत असून, पोलिस भरतीच्या ‘उमेदवारांच्या’ परीक्षेचे नियोजन निवडणुकीनंतरच होणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत सरावाला अवधी मिळणार आहे. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील रिक्त जागांच्या तपशिलासह अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस दलात २१० शिपाई, ५२ चालक, तर कारागृह दलात ११८ शिपाई अशा एकूण ३८० जागांवर भरती होत आहे. यंदा सन २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही अखेरची संधी होती. त्यानुसार तीनही संवर्गात सुमारे ७० हजारांपर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत.
दरम्यान, ग्रामीण पोलिस दलात होणाऱ्या भरतीमुळे सिंहस्थापूर्वी नवप्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचे ‘बळ’ प्राप्त होणार आहे. सन २०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांत दीडशे, तर सन २०२४ मध्ये ३२ जागांवर भरती झाली होती. त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या भरतीतील पोलिसांचे बळ सिंहस्थात वापरता येणार आहे.
-
मुंबई, नवी मुंबई, मीरा-भाईंदर व पुण्यात सर्वाधिक अर्ज
-
कारागृह, एसआरपीएफ शिपाई संवर्गाला अनेकांची पसंती
-
प्राप्त अर्जाची छाननी होणार: मैदानी चाचणीवेळी कागदपत्रे तपासणी
-
बारावी उत्तीर्णांसह पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर, इंजिनीअर, आयटी क्षेत्रातील उमेदवार स्पर्धेत
-
सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा
-
शारीरिक चाचणीनंतर एका पदास दहा उमेदवारांची निवड
-
पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा
-
पोलिस भरतीदरम्यान एखाद्या उमेदवाराने दोन अर्ज सादर करू नये, असे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, गतवर्षी झालेल्या पोलिस भरतीत काही उमेदवारांनी एकाच संवर्गासाठी ई-मेल व मोबाइल क्रमांक बदलून दोन ठिकाणी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी काहीजण पोलिस दलात गुणवत्तेच्या आधारे नियुक्त झाले. मात्र, त्यांनी भरतीवेळी नियमाचा भंग केल्याने त्यांच्यावर आता खातेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाने अकरा पोलिस केल्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे सन २०२५ मधील भरतीदरम्यान दोन अर्ज केलेल्या अंमलदारांची सेवा समाप्त उमेदवारांचेही धाबे दणाणले आहे.







