टोल नाक्यावरील रांगांना राम-राम! गडकरींची मोठी घोषणा; लवकरच AIने होणार टोल संकलन, कधीपासून? जाणून घ्या
सन २०२६च्या अखेरपर्यंत देशभरात उपग्रह तसेच एआयवर आधारित टोलसंकलन प्रणाली कार्यान्वित केली जाईल. त्यामुळे प्रवाशांची टोलनाक्यावरील प्रतीक्षा पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. या प्रणालीमुळे दीड हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत होईल, सरकारी महसुलात सहा हजार कोटी रुपयांची भर पडेल, असे ते म्हणाले.
प्रश्नोत्तरांच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. टोलवसुलीची कार्यक्षमता वाढवणे आणि वाहनांची वाहतूक अखंड सुरू ठेवणे यांसाठी सरकारने ‘मल्टी-लेन फ्री फ्लो टोल’ (एमएलएफएफ) इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एआयद्वारे ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन आणि (एएनपीआर) आरएफआयडी-आधारित इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (फास्टॅग) यांचा एकत्र वापर केला जाईल, असे गडकरी यांनी सभागृहाला सांगितले.
मल्टी-लेन फ्री फ्लो टोल (MLFF) ही एक खूप चांगली सुविधा आहे. पूर्वी, आम्हाला टोलवर पैसे द्यावे लागत होते आणि त्यासाठी ३ ते १० मिनिटे लागायची; त्यानंतर, फास्टॅगमुळे हा वेळ ६० सेकंद किंवा त्याहून कमी झाला. आमचे उत्पन्न किमान ५,००० कोटी रुपयांनी वाढले आहे. फास्टॅगची जागा घेतल्यानंतर MLFF प्रणाली आल्यामुळे, आता गाड्या ताशी ८० किलोमीटर वेगाने टोल पार करू शकतात आणि टोलवर कोणालाही थांबवले जाणार नाही, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
